बोकड कापलाय... कंदुरीला या! आ.जाधवांचे सूचक वक्तव्य

Foto

औरंगाबाद: मतमोजणीचे कल हळूहळू स्पष्ट होताच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मतमोजणी केंद्राकडे धाव घेतली. सर्वात प्रथम आमदार हर्षवर्धन जाधव यांचे मतदान केंद्रात आगमन झाले. त्यावेळी पहिल्या चार फेर्‍या आटोपल्या होत्या अन ट्रॅक्टर सुसाट धावत होते. खैरे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. जाधव यांचे आगमन होताच पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. जाधव यांच्या चेहर्‍यावर आनंदी छटा स्पष्ट दिसत होत्या. पत्रकारांनी प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. एका प्रश्नावर ’बोकड कापलाय, कंदुरीला या’ हे त्यांचे उत्तर चाणाक्ष राजकीय नेत्याची साक्ष देत होते, हे निकाला अंती स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीत आमदार जाधव यांची एंट्री धमाकेदार ठरली. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यालय औरंगाबाद असल्याने या हवेवर स्वार होण्याचे स्वप्न जाधव पाहत होते. प्रारंभी सुसाट धावणारे जाधवांचे ट्रॅक्टर मतदानाच्या दोन दिवस अगोदर पंक्चर  झाले. आता विजय अशक्य असल्याचे जाधव यांच्याही लक्षात आले होते. मात्र, उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा चंगच त्यांनी बांधला अन् त्यात त्यांना यशही आले. पहिल्या फेरीपासून जाधव दुसर्‍या क्रमांकावर राहिले ते तब्बल आठ-नऊ फेर्‍यांपर्यंत! सुरुवातीच्या तीन-चार फेर्‍या संपल्यानंतर जाधवांचे कार्यकर्ते उत्साहात होते. याच दरम्यान जाधव यांचे आगमन झाले अन् कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जाधव मतमोजणी केंद्रात आल्यानंतर छायाचित्रकार आणि पत्रकारांनी त्यांना घेरले. प्रतिक्रिया विचारली असता, मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगत बोकड कापलाय हे सांगायलाही ते विसरले नाहीत. पत्रकारांना कंदुरीचे आवतन देत त्यांनी आपण चाणाक्ष राजकारणी असल्याचे दाखवून दिले.

पत्नीच्या पराभवाची सल
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार जाधव यांच्या पत्नी संजना यांचा पराभव झाला होता. खासदार खैरे यांनी रसद पुरवल्यानेच पत्नीचा पराभव झाला, ही सल आमदार जाधव यांना बोचत होती. त्याच पराभवाचे उट्टे काढण्याचा चंगच जणू जाधवांनी बांधला अन तब्बल पावणे तीन लाख मते घेत खैरे यांचे सिंहासन ध्वस्त केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker